Saturday, June 5, 2010

माझ्याकडे उत्तरं नाहीत

माझ्याकडे उत्तरं नाहीत


काही विचार कसे हाताळावे
ते मला कधीच कळत नाही
ते विचार मला थांबवतात
आणि मी कधीच पळत नाही

मग हातात येतात ते
विचार कागदावर मांडतो
आणि त्या रिकाम्या कपात
मी कॉफी बनून सांडतो

कधी पेटवणारी ठीणगी
कधी पेटलेली आग आहे
कधी थंड झालेली कॉफी
कधी तिचा पडलेला डाग आहे

कितीही शिकलो तरी
मला न कळलेली उत्तरं आहेत
सदैव पडणारे प्रश्न आणि
त्यांची न मिळालेली उत्तरं आहेत

-- मयुरेश कुलकर्णी

--------------------------------------------------------


आजकाल अडकलेल्या श्वासात
स्वातंत्र्य का सापडत नाही
मुक्तपणे श्वास कोंडतो पण
ते ही मनाला आवडत नाही

आजकाल प्रश्न जास्त
आणि एकही उत्तर मिळत नाही
का जगावं? कसं जगावं?
मनाला कशासाठी जगवावं कळत नाही?

आजकाल मन गोंधळतं इतकं
की निराशही ते होत नाही?
आणि सुखी कधी नव्हतंच
पण समाधानी पण होत नाही?

आजकाल कापलेले हात चालतात
कापणारे हात चालत नाही
न होण्याऱ्या संकटाची चिंता मारते
माणसाला संकट मारत नाही

आजकाल मी म्हणतो मी वेडा
कुणाला शहाणपण शिकवू शकत नाही
वेडा असलो तरी इतकं कळतं की
बुध्दीत सुख टिकत नाही

-- मयुरेश कुलकर्णी

-----------------------------------------------------------------


घड्याळ म्हणतं रात्र झाली
शरीर म्हणतं झोपू दे
मन उत्तरं शोधत बसतं
आणि मी म्हणतो बसू दे

माझ्याकडे उत्तरं नाहीत
प्रश्न ही वाटतं बरोबर नाहीत
वाटतं हा शोधच एकटा
देव ही वाटतं बरोबर नाही

पण प्रश्न विचारल्याशिवाय
मन शांत बसत नाही
आणि या उत्तराच्या
शोधाचा अंत दिसत नाही

शोधणारे संपले तर मग
उत्तरंच प्रश्नात लपून जाईल
आणि घड्याळाचा आदेश पाळत
मी प्रश्न घेऊन झोपून जाईन

-- मयुरेश कुलकर्णी

---------------------------------------------------------------


माझ्याकडे उत्तरं नाहीत

काळ्या अंधारात दडलेला
समाजाचा चेहरा पहावा कसा
आणि सज्जनांचे मुखवटे सगळे
राक्षसाचा चेहरा ओळखावा कसा

पोट हातावर घेऊन जगणाऱ्यांच्या
नशिबाचा भार अनुभवावा कसा
अपंगांची लाचारी जाणून आपण
त्यांच्यातला स्वाभिमान जगावा कसा

जन्मलेल्या बाळाला त्याच्या
आईचा त्याग सांगावा कसा
आणि मुक्या रिकाम्या पोटाचा
वेदनांचा आवाज ऐकावा कसा

ज्यांचं दु:ख मला कळत नाही
त्यांना नावं ठेवायचा, हक्क मला नाही
मी काही केलं नाही, तर
"काही होत नाही" म्हणायचा हक्क मला नाही

जे मी समजू शकत नाही
त्याचा मी आदर केला पाहिजे
आदराला कारणं लागलीच
तर मी निरपेक्ष प्रेम केलं पाहिजे

उत्तरं मिळाली नाहीततरी
सतत प्रश्न विचारत जगावं
जशी जमेल तशी मदत करत
देवाचे आभार मानत जगावं

-- मयुरेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment