Saturday, June 5, 2010

तर्क मेलाय

तर्क मेलाय
--मयुरेश


मित्रांनो,
सांगण्यास दु:ख होतं
की या कलीयुगात
तर्क आता आपल्याकडे
नाही राहिला
तर्क मेलाय


चांगला होता बिचारा
तसा म्हातारा असून
धड-धाकट होता
कदाचित मनाने खचलेला
डॉक्टर म्हणाले की
जगण्याची उमेद संपलेली
म्हणून तर्क मेलाय


बहूतेक सामान्य द्न्यान जेव्हा
असामान्य झालं
तेव्हा त्याचा जोडीदार गेला
म्हणूनच डॉक्टर म्हणाले
तर्क मेलाय


टी. व्ही वर सगळ्यांना
मार्कांसाठी, वोटांसाठी
नाचताना आणि गाताना पाहिलं
की स्वखुशीसाठी नाचणं, गाणं
कधी बंद झालं
हे विचार करत
तर्क मेलाय


अचानक काहीच झालं नाही
तर्काने हळूहळू मृत्यु स्विकारलाय
बिचारा किती आशावादी होता तो
वास्तवाने त्याचा जीव घेतलाय
आता तर्क मेलाय


लोकं हॉटेलात हजारो रूपये उडवतात
कपडे, दागिने मनात आलं की घेतात
पण रिक्षावाल्याशी एका रूपयाला भांडतात
आणि यांच्याकडे दान करायची वेळ आली
की पैसे संपतात
कारण
तर्क मेलाय


शेवटी फार त्रास झाले त्याला
फार भोगावे लागले
'काय करायचं आणि काय करावं ', हे
लोकांना सांगून सांगून
फार पापं केली त्याने
जाऊदे,
गेलेल्याविषयी वाईट बोलू नये
सुटला एकदाचा बिचारा
आता तर्क मेलाय


जग बदलायला निघालेला वेडा
सामान्य द्न्यानाने गुडघे टेकले तर
हा तरी काय करणार
सत्ययुगातली स्वप्ने उरी बाळगून
आता कायमचा झोपलाय
तर्क मेलाय


माणसं कुत्र्यांना हटवायला प्रेमाने
'हाड-हाड' तरी म्हणतात
रस्त्यावर चालणाऱ्यांना
हॉर्न वाजवून पळवतात
माणसांपेक्षा माणसाला
कुत्र्यांची किम्मत जास्त
असं वाटायला लागलय
कारण
तर्क मेलाय

१०
देवासारखी त्याची वेगवेगळी रुपे
वेगवेगळे अवतार, नावं आहेत
कोणी माणुसकी म्हणतं,
कोणी अक्कल म्हणतं, बुध्दी म्हणतात
कोणी सामान्य द्न्यान म्हणतात
भरपुर नावं, पण अर्थ तोच होतो
कदाचित देवाने पृथ्वीवरचा तबा सोडलाय
म्हणूनच तर्क मेलाय

११
तर्क म्हणजे संगम आहे
(आता 'होता' असं म्हणावं लागेल)
वेदात, उपनिशदात, अरण्यकात
आणि आजून पुस्तकातलं द्न्यान,
ऋषींच्या पध्दती, वागणूक, आचार-विचार,
आदर आणि आदर्श, तत्त्व आणि तत्त्वद्न्यान,
सत्याचा शोध, द्न्यान मिळवायची कणकण,
मोक्ष गाठण्यासाठी केलेला सनातन प्रवास,
या सगळ्यांचा निराकार संगम होता तो
पण आता तर्क मेलाय

१२
लोकं म्हणतात "काय अक्कल नाहीये का?"
"डोकं सोडून काम करतोयस का?"
"आज माणुसकी राहिली नाही"
हे सगळं ऐकायला मिळतं
कारण
अक्कल, डोकं माणूसकी ही
ज्याची नावं आहेत आणि
मी ज्याला तर्क म्हणतोय
आता तो नाही राहिला
तर्क आता मेलाय

१३
माणसाकडे माणसाला वेळ नाही
वेळ नसतोच, वेळ काढावा लागतो
माणसाकडे स्वत:साठी वेळ नाही
सत्यासाठी वेळ नाही, तत्त्वांसाठी वेळ नाही
या अशा मायेच्या मोहात धावणाऱ्या
माणूस नामक यंत्राने,
या संगणकासमोर बसलेला
प्रगत युगातल्या माकडाने
खून केलाय त्याचा
म्हणून तर्क मेलाय

१४
"याला इतका पगार आहे
आणि तो इतकं कमवतो
त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे
पैस्याचा पाऊस आहे"
डोक्यात किती आहे यापेक्षा
खिशात किती आहेत यावरून
माणसाची किम्मत आणि मोल ठरतं
त्या वेळी समजावं
तर्क मेलाय

१५
एक तर त्याला पटलच नाही
गंगेत लोकं त्यांची पापं धूतात
आणि पापं धुऊन, ती पवित्र कशी राहील
इतकी पापं ती तरी कशी पवित्र करणार
इतकी घाण ती तरी कशी धुणार
आज त्याच गंगेचं पाणी
ओतलं त्याच्या तोंडात
जेव्हा तर्क मेलाय

१६
याला मार्कांची चिंता तर
त्याला नोकरीची काळजी
ही आरशात पाहून तोंड वाकडं करते
ती मुलांमध्ये, नवऱ्यात आणि घरात स्वत:ला हरवते
काही सतत फोनला चिकटलेले तर
काही "कोणी विचारत नाही!" म्हणून रडतात
काही प्रेमात अडकलेले तर
काही नको असलेल्या मित्रांत फसतात
काही नातेवाईकांशी संबंध संभाळतात
तर काही कृत्रिम मुखवटे जपतात
इतकी चिंता आणि इतकी बंधने,
इतकी घाबरणं आणि इतकं अडकणं
तरी लोकं १५ ऑगस्टला स्वातंत्र्य गीते गातात
"आपण खरच स्वतंत्र का?" हे कुणी विचारत नाही
कारण तर्क मेलाय

१७
साधा अर्थशास्त्रातला धडा आहे
जिथे पिकतं तिथे विकत नाही
जे जास्त मिळतं त्याचं महत्त्व नाही
जिथे पुरवठा जास्त, तिथे किम्मत कमी
म्हणूनच
जशी लोकसंख्या वाढते
तसा जिव स्वस्त होतोय
कारण तर्क मेलाय

१८
"तू ना, तू असं कर"
"आता BCom झालास ना, आता CA कर"
दुसऱ्याने काय करावं हे
लोकांना माहिती आहे पण
त्यांच्या लक्षाचा पत्ता नाही
आजकाल तर्क बोलत नाही
आणि लोकं आपल्याला सांगतात
आपण काय करावं, कसं वागावं
तर्क बोलूच शकत नाही आता
कारण तर्क मेलाय

१९
परदेशी आम्ही भारतीय
आणि भारतात आम्ही परदेशी
आम्ही इथलेही नाही, तिथलेही नाही
आम्ही कुठलेच उरलो नाही
असं आपल्या माणसांनी परकं केलं
की समजावं
तर्क मेलाय

No comments:

Post a Comment