Saturday, June 5, 2010

मी काहीच केलं नाही

मी काहीच केलं नाही


भायखळा ते ठाणे जलद लोकल
एका सिग्नलवर क्षणभर थांबली
मी ट्रेनच्या दारात उभा
मी सहज बाहेर नजर टाकली
माझी नजर दोन लहान डोळ्यांनी पर्तवली
आणि मी काहीच केलं नाही


दोन लहान डोळे, कोमल डोळे
शुभ्र, पवित्र, निरागस डोळे
एका लहान मुलाचे गरीब डोळे
मला मदत मागत होते
आणि मी काहीच केलं नाही


तो बाजूच्या रिकाम्या रूळावर बसला होता
दगडांशी खेळत होता
आणि आई भाजा उगवत होती
तो दया मागत नव्हता पण
मी त्याला फक्त दया दिली
आणि मी काहीच केलं नाही


माझ्याबरोबर इतरही लोकं होते
त्यांचीही मनं त्यांना सांगत होती
मुलांची जागा रूळावर नाही
त्यांनी पण दुर्लक्ष केलं, आणि मी पण
इतरांपेक्षा मी वेगळा असं म्हणतो, पण
इतरांपेक्षा वेगळं असं
मी काहीच केलं नाही


तो मजेत खेळत होता, रमत होता
माझ्याकडे दयेची भीक मागत नव्हता
मलाच वाईट वाटलं, आणि मी क्षणात
त्याला दया देऊन, त्याचा अपमान केला
आणि मी काहीच केलं नाही


त्याच्यासारखी कित्येक मुलं असतात
हे ठाऊक आहे मला
मी एकटाच काही करू शकत नाही
हे पण माहिती आहे
पण कोणी काहीच केलं नाही
तर कधीच काही होणार नाही
आणि करायची संधी मिळाली
तेव्हा मी काहीच केलं नाही


मला त्याच्याएवढी भाची आहे
तो ही कोणाचा भाचा असेल
मी काहीतरी करू शकलो असतो
पण मी काहीच केलं नाही


माझी जशी स्वप्ने आहेत
तशी उद्या त्याचीही असतील
आपण आपलं भाग्य घेऊन येतो
मी भाग्यवान, आणि तो नाही
करणारे, समाजाचे नियम तोडून करतात
पण मी काहीच केलं नाही


मला काय झालं? काय बदललं?
मी तर असा नव्हतो
रोज रोज हेच बघतो म्हणून
न बघीतल्या सारखं करतो का?
मी इतका क्रूर, इतका कठोर
इतका दगड कधी झालो की
मी काहीच केलं नाही

१०
ट्रेन पुन्हा सुरू झाली
थांबलेल्या जगाबरोबर मी वेग घेऊ लागलो
बाकीच्या लोकांसारखं मी ही
काही झालं नाही असं वागलो
माझीच मला लाज वाटली की
मी काहीच कसे केलं नाही

११
तेच लहान, निरागस डोळे
रात्री झोपताना मला परत आठवले
आणि माझं मन मला सतावू लागले
आता कधीच ते डोळे विसरणार नाही
आणि जेव्हा आठवतील
तेव्हा आठवण करून देतील
की मी काहीच केलं नाही

--मयुरेश

No comments:

Post a Comment