Saturday, June 5, 2010

माया

माया

मी थकून घरी येतो
दिवे घालवतो, झोपायला जातो
पांघरूण डोक्यावरून घेतलं की
कानात एक आवाज
हळूच येऊन सांगतो

आज थकला असशील तू
शरीर कष्ट करून थकतं
पण काम झालं नाही
तुझं काम संपलं नाही
ही क्षणभराची विश्रांती आहे
हा अंत नाही, ही निवृत्ती नाही
काम संपल्या शिवाय तुला
चांगली झोप लागणार नाही

कदाचित हीच अस्वस्थता
मला सकाळी उठवते
मनात समाधान नाही
म्हणून शरीर राबतं

माझं काम अजून झालं नाही
संपलं तर नाहीच, कदाचित
सुरूपण झालं नाही
आज पर्यंत जे केलं ते
शिक्षण होतं, पाया होता
अजून कर्माची इमारत
त्याच्यावर उभारली नाही

मग परत रात्रीचे आवाज
मला सांगतात
पण काम अजून झालं नाही
तुझं काम संपलं नाही

-- मयुरेश कुलकर्णी
---------------------------------------------

मला वाटतं, मी वेडा
हे आवाज कोणालाच कळत नाही
पण कधी वाऱ्याला हात लावला
की कळतं हे आवाज खोटे नाही

याला उत्तरही नाही आणि
स्पष्टीकरण ही नाही
पण तसंही प्रेम करायला
विश्वास ठेवायला
कारण कुठे लागतच नाही

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------

कधी हा आवाज म्हणतो
कॉफी म्हणजे कॉफी नाही
नुसतं उकळलेलं पाणी नाही
विर्घळणारे काळे कण नाही

कॉफीच्या वाफेत एक तरंग
काळ्या पाण्यात प्रकाश
कणाकणात लपलेले माझे विचार
डोक्यात उर्जा पोचवणार

कधी बंद दरवाजे उघडणार
कधी रस्ते दिशा दाखवणार
कधी आई बाळाला जवळ घेते
तसं जवळ घेऊन म्हणणार

काळजी करू नकोस
तू एकटाच नाहीस
तू जाशील तिथे मी
तुझ्या बरोबर आहे

....कॉफी म्हणजे कॉफी नाही

-- मयुरेश कुलकर्णी

------------------------------------------------

कधी येतात वादळं
कधी सुटतात वारे
माझं समुद्र किनाऱ्यावर घर
मी बसून बघतो सारे

घराच्या भिंती बाहेर
लागतात पाठी माझ्या
मी विचारांच्या वादळापुढे
मला पकडायचा प्रयत्न करतात

मी पळून घरात जातो
वादळ कागदावर लिहून काढतो
कधी वादळात विचार भरकटतात
जेव्हा घरात जायला वेळ लागतो

कधी वेळेवर आलो मी तर
तेव्हा सरळसोट येतात बरोबर
कधी थोडासा उशीर झाला
की शेपटी धरून उतरवतो कागदावर

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------

काम करताना स्वत:ला विचारतो
की हे सगळं का करतो मी
('का?' हा प्रश्न विचारायची
वाईट सवय ही जात नाही)
मी हे का करतो
काय कारण, काय प्रेरणा

हे करून काय मिळतं
आणि काय हरवतं
खरंच काही मिळतं का
फक्त भास होतो
हे सगळं खरं कसं करायचं
आणि ते खरं करायचं
का आपणच खोटं व्हायचं
स्वत:च एक भ्रम बनायचं
काय सोपं? काय अवघड?
याचं वजन करून हा
निर्णय का घ्यायचा

आणि जर हे खरं करायचं
तर ते करायचं कोणासाठी
माझ्यासाठी?
नाही हे डोळे बंद केले तर
हे सगळ खरं आहे माझ्यासाठी
आणि जर माझ्यासाठी नाही
तर ते करायचं कोणासाठी

आणि जर लोकांसाठी करतो
तर मी हे का करतो

का? हा प्रश्न विचारायची
वाईट सवय जात नाही
उत्तर तर मिळत नाही
आणि समाधान तर नाहीच नाही

-- मयुरेश कुलकर्णी
-----------------------------------------------------

डोळे उघडले की दार दिसतं
दार उघडलं की अंधारी खोली
मग परत त्या खोलीत दारं
आणि बरीच दारं आणि
बाऱ्याच खोल्या

अंधारातून हात येतात
किंवा त्याचा भास होतो
ते मला खेचतात
दारांकडे नेतात

पण मला हे हात नकोत
त्यांचा स्पर्शही नको
खोल्या नकोत आणि
दारं तर नकोच नको

हा खेळ मला खेळायचा नाही
दारं उघडायची नाही
खोल्या ओलांडायच्या नाही

म्हणून मी डोळे उघडत नाही
आणि दार उघडायचा,
बघायचाही,
प्रश्न पडत नाही

-- मयुरेश कुलकर्णी
---------------------------------------------

सुख आणि समाधानात
गोंधळ होण्याची कारणे
माझ्या मनात अनेक

मी नक्की केव्हा काय?
हे कधीच कळत नाही मला

तो आवाज सांगतो मला
मी समाधानी नाही
प्रत्येक कोडं सुटलं की
काही क्षण आनंद
पण परत कोडी लागतात
अजून प्रश्न पाहिजे असतात
हे समाधान नाही

आणि सुखाची व्याख्या तर
इतकी बदलते की ती
कधीच हातात सापडत नाही

उपाशी माणसाला भाकरीच्या
कणात मिळतं ते सुख?
प्रेमिला प्रेमिकेच्या
प्रेमात मिळतं ते सुख?
बाळाला आईच्या कुशीत
सुरक्षतेचं सुख?
पैसे मिळाल्याचं सुख का,
गेल्यावर नसल्याचं सुख?
किंवा
सुखाचा भास म्हणजे सुख
का दु:खाचा आभाव म्हणजे सुख?

कदाचित
रात्री झोप लागणं आणि
सकाळी उठल्यावर काम करावसं वाटणं
हेच कदाचित सुख

-- मयुरेश कुलकर्णी
-------------------------------------------------------------------

एकदा मावशी म्हणाली मला
"तुला वेदना विकता आल्या पाहिजे"

खरंतर विकणं म्हणजे
वेदना देऊन, पैसे घेणं हे नाही
विकणं म्हणजे
आपल्या वेदना लोकांना
दाखवून, समजवून
भोगता आल्या पाहिजेत
हे विकणं
मग त्यात पैसे असो वा नसो

आणि कधी कधी खरंच वाटतं
वेदना विकता आल्या पाहिजे

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------------------

शक्ति, भक्ति आणि मुक्ति
यांची गोष्ट एकदम
साधी, सरळ आहे

त्याने जन्म दिला मला
त्याने जगायची शक्ति दिली
त्याने सुरू केलं सारं
त्याने अंताला मुक्ति दिली

आता सुरू तर त्याने केलं
आणि संपवायचं पण त्याने
माझ्या हातात फक्त
भक्ति दिली

रोज उठायचं
अन्न खायचं
पाणी प्यायचं
आपलं काम करायचं
एवढच नीट करून झोपायचं

इतकच माझ्या हातात आहे
हीच माझी भक्ति आहे

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------

मी मायाला सांगतो
आता मी काम करतोय
आता मला वेळ नाही

काल कॉफी पीत होतो
तुझी वाट बघत होतो
आपली ठरलेली भेट
तुझ्यासाठी थांबलो होतो

तू डोक्यातही आली नाही
कागदावरही आली नाही
वाया गेली कॉफी माझी
प्रेरणा काही आली नाही

आता तू आलीस अचानक
कागदावर जन्मायचं तुला
पण आता मी काम करतोय
आता वेळ नाही मला

तुला भ्रमातून सत्यात यायचं
असेल तर थांब
तुला जन्मायचं असेल तर थांब

कारण आता मला वेळ नाही
काल मी थांबलो होतो पण
तू आलीच नाहीस
यात माझा दोष नाही

-- मयुरेश कुलकर्णी
-----------------------------------------------------

कधी माणसाशी बोलताना त्याच्या
डोळ्यांकडे लक्ष द्या
आणि तो "मी तयार आहे" किंवा
फक्त "मी आहे" असं
म्हणाला तर परत बघा

जर त्याच्या डोळ्यात गांभिर्य दिसलं
तर एक वेगळच तेज दिसेल
अशावेळी माणूस, माणूस नाही
शक्तिशाली देव असेल

हे दर-रोज होत नाही
आणि सहज होत नाही
पण जेव्हा होतं तेव्हा असं की
कसलच स्पष्टीकरण लागत नाही

ही वेळ फार शुभ
कारण माणूस सगळं स्विकारतो
धाडस एकवटून सारं
नशिब परत लिहायचं ठरवतो

नशिब तोडतं त्याला
तो परत स्वत:ला जोडतो
आणि जोडलेल्या ठिकाणी
तो अजून मजबूत बनतो

डोळ्यात तेज असतं
तो नशिबाकडे बघतो
फारसं बोलत नाही
फक्त "मी तयार आहे" म्हणतो

-- मयुरेश कुलकर्णी

----------------------------------------------------------------------

प्रत्येका माणसाला खोलीत
एक समाधीस्थान असावं

जसं झोपल्यावर शरीराला विश्रांती मिळते
तसं या स्थानावर बसून शांती मिळावी

मला असं वाटतं
की प्रत्येका मनाला
शांतता हवी असते
आवाज नसलेली शांतता नाही
आणि सगळे आवाज असलेलीही नाही
आणि विचारांची पण नाही

पण प्रत्येका माणसाला
एक समाधीस्थान असावं

तिकडे गेल्यावर त्याचं मन मोकळं व्हावं
परत जगायची इच्छा जागी व्हावी

एकांतात जसं दु:ख आहे
तशी शक्ति पण आहे
प्रेरणा आहे, स्वतंत्रता आहे
स्वत:च्या शोधाचा आग्रह आहे

प्रत्येका मनाला कुठेतरी स्वतंत्र वाटावं
घरात असल्यासारखं मुक्त वाटावं
म्हणून प्रत्येकाने स्वत:च्या मनासाठी
किमान एवढं तरी करावं

-- मयुरेश कुलकर्णी

----------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment