Saturday, June 5, 2010

तर्क मेलाय

तर्क मेलाय
--मयुरेश


मित्रांनो,
सांगण्यास दु:ख होतं
की या कलीयुगात
तर्क आता आपल्याकडे
नाही राहिला
तर्क मेलाय


चांगला होता बिचारा
तसा म्हातारा असून
धड-धाकट होता
कदाचित मनाने खचलेला
डॉक्टर म्हणाले की
जगण्याची उमेद संपलेली
म्हणून तर्क मेलाय


बहूतेक सामान्य द्न्यान जेव्हा
असामान्य झालं
तेव्हा त्याचा जोडीदार गेला
म्हणूनच डॉक्टर म्हणाले
तर्क मेलाय


टी. व्ही वर सगळ्यांना
मार्कांसाठी, वोटांसाठी
नाचताना आणि गाताना पाहिलं
की स्वखुशीसाठी नाचणं, गाणं
कधी बंद झालं
हे विचार करत
तर्क मेलाय


अचानक काहीच झालं नाही
तर्काने हळूहळू मृत्यु स्विकारलाय
बिचारा किती आशावादी होता तो
वास्तवाने त्याचा जीव घेतलाय
आता तर्क मेलाय


लोकं हॉटेलात हजारो रूपये उडवतात
कपडे, दागिने मनात आलं की घेतात
पण रिक्षावाल्याशी एका रूपयाला भांडतात
आणि यांच्याकडे दान करायची वेळ आली
की पैसे संपतात
कारण
तर्क मेलाय


शेवटी फार त्रास झाले त्याला
फार भोगावे लागले
'काय करायचं आणि काय करावं ', हे
लोकांना सांगून सांगून
फार पापं केली त्याने
जाऊदे,
गेलेल्याविषयी वाईट बोलू नये
सुटला एकदाचा बिचारा
आता तर्क मेलाय


जग बदलायला निघालेला वेडा
सामान्य द्न्यानाने गुडघे टेकले तर
हा तरी काय करणार
सत्ययुगातली स्वप्ने उरी बाळगून
आता कायमचा झोपलाय
तर्क मेलाय


माणसं कुत्र्यांना हटवायला प्रेमाने
'हाड-हाड' तरी म्हणतात
रस्त्यावर चालणाऱ्यांना
हॉर्न वाजवून पळवतात
माणसांपेक्षा माणसाला
कुत्र्यांची किम्मत जास्त
असं वाटायला लागलय
कारण
तर्क मेलाय

१०
देवासारखी त्याची वेगवेगळी रुपे
वेगवेगळे अवतार, नावं आहेत
कोणी माणुसकी म्हणतं,
कोणी अक्कल म्हणतं, बुध्दी म्हणतात
कोणी सामान्य द्न्यान म्हणतात
भरपुर नावं, पण अर्थ तोच होतो
कदाचित देवाने पृथ्वीवरचा तबा सोडलाय
म्हणूनच तर्क मेलाय

११
तर्क म्हणजे संगम आहे
(आता 'होता' असं म्हणावं लागेल)
वेदात, उपनिशदात, अरण्यकात
आणि आजून पुस्तकातलं द्न्यान,
ऋषींच्या पध्दती, वागणूक, आचार-विचार,
आदर आणि आदर्श, तत्त्व आणि तत्त्वद्न्यान,
सत्याचा शोध, द्न्यान मिळवायची कणकण,
मोक्ष गाठण्यासाठी केलेला सनातन प्रवास,
या सगळ्यांचा निराकार संगम होता तो
पण आता तर्क मेलाय

१२
लोकं म्हणतात "काय अक्कल नाहीये का?"
"डोकं सोडून काम करतोयस का?"
"आज माणुसकी राहिली नाही"
हे सगळं ऐकायला मिळतं
कारण
अक्कल, डोकं माणूसकी ही
ज्याची नावं आहेत आणि
मी ज्याला तर्क म्हणतोय
आता तो नाही राहिला
तर्क आता मेलाय

१३
माणसाकडे माणसाला वेळ नाही
वेळ नसतोच, वेळ काढावा लागतो
माणसाकडे स्वत:साठी वेळ नाही
सत्यासाठी वेळ नाही, तत्त्वांसाठी वेळ नाही
या अशा मायेच्या मोहात धावणाऱ्या
माणूस नामक यंत्राने,
या संगणकासमोर बसलेला
प्रगत युगातल्या माकडाने
खून केलाय त्याचा
म्हणून तर्क मेलाय

१४
"याला इतका पगार आहे
आणि तो इतकं कमवतो
त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे
पैस्याचा पाऊस आहे"
डोक्यात किती आहे यापेक्षा
खिशात किती आहेत यावरून
माणसाची किम्मत आणि मोल ठरतं
त्या वेळी समजावं
तर्क मेलाय

१५
एक तर त्याला पटलच नाही
गंगेत लोकं त्यांची पापं धूतात
आणि पापं धुऊन, ती पवित्र कशी राहील
इतकी पापं ती तरी कशी पवित्र करणार
इतकी घाण ती तरी कशी धुणार
आज त्याच गंगेचं पाणी
ओतलं त्याच्या तोंडात
जेव्हा तर्क मेलाय

१६
याला मार्कांची चिंता तर
त्याला नोकरीची काळजी
ही आरशात पाहून तोंड वाकडं करते
ती मुलांमध्ये, नवऱ्यात आणि घरात स्वत:ला हरवते
काही सतत फोनला चिकटलेले तर
काही "कोणी विचारत नाही!" म्हणून रडतात
काही प्रेमात अडकलेले तर
काही नको असलेल्या मित्रांत फसतात
काही नातेवाईकांशी संबंध संभाळतात
तर काही कृत्रिम मुखवटे जपतात
इतकी चिंता आणि इतकी बंधने,
इतकी घाबरणं आणि इतकं अडकणं
तरी लोकं १५ ऑगस्टला स्वातंत्र्य गीते गातात
"आपण खरच स्वतंत्र का?" हे कुणी विचारत नाही
कारण तर्क मेलाय

१७
साधा अर्थशास्त्रातला धडा आहे
जिथे पिकतं तिथे विकत नाही
जे जास्त मिळतं त्याचं महत्त्व नाही
जिथे पुरवठा जास्त, तिथे किम्मत कमी
म्हणूनच
जशी लोकसंख्या वाढते
तसा जिव स्वस्त होतोय
कारण तर्क मेलाय

१८
"तू ना, तू असं कर"
"आता BCom झालास ना, आता CA कर"
दुसऱ्याने काय करावं हे
लोकांना माहिती आहे पण
त्यांच्या लक्षाचा पत्ता नाही
आजकाल तर्क बोलत नाही
आणि लोकं आपल्याला सांगतात
आपण काय करावं, कसं वागावं
तर्क बोलूच शकत नाही आता
कारण तर्क मेलाय

१९
परदेशी आम्ही भारतीय
आणि भारतात आम्ही परदेशी
आम्ही इथलेही नाही, तिथलेही नाही
आम्ही कुठलेच उरलो नाही
असं आपल्या माणसांनी परकं केलं
की समजावं
तर्क मेलाय

आठवत नाही

आठवत नाही

मी कोण
मी काय करतो
माझं नाव काय
मला आठवत नाही

काहीतरी सांगायचं होतं मला
सोपं होतं, अर्थपूर्ण होतं
तुम्हाला आवडेल असं होतं
दोन क्षणांपूर्वी डोक्यात आलेलं
आता ते ही आठवत नाही

माझ्याबद्दल होतं काहीतरी
मस्त होतं, छान होतं
तुम्ही हसाल असं होतं

नाही नाही, मस्त नव्हतं
दु:खाबद्दल होतं, वेदना होत्या
तुम्ही सून्न व्हाल असं होतं

किंवा वाटतय, गहन होतं
खोल होतं, वेडं आणि विचित्र होतं
तुम्ही विचार कराल असं होतं

जाऊदे, कदाचित आठवायचं नसेल
म्हणूनच आठवत नाही
किंवा सांगायचं नाही
म्हणूनच सांगत नाही

--मयुरेश कुलकर्णी

तो आणि ती

तो आणि ती


तो थकून घरी येतो
ती थकून घरी येते
तो कॉफी करतो
ती गाणी लावते
दोघे शांत बसून कॉफी पितात...
मौनाच्या भाषेतून हृदयांशी बेलायचं
हेच तर प्रेम असतं


तो तिच्याकडे बघतो
ती त्याच्याकडे बघते
तिचं हास्य प्रश्न विचारतं
त्याचे डोळे उत्तरं देतात...
त्या हास्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं
हेच तर प्रेम असतं


तो एकटा चालतो
ती एकटी चालते
मग दोघे भेटतात
हातात हात घेऊन चालतात...
काही पावलं एकटं चालून पून्हा एकत्र येणं
हेच तर खरं प्रेम असतं


तो पंखा बंद करतो
ती पंखा सुरू करते
तो परत पंखा बंद करतो
ती, तो झोपल्यावर, पंखा परत सुरू करते...
कधी त्याचं खरं तर कधी तिचं खरं
हेच तर प्रेम असतं


तो कॉफी हवी आहे का विचारतो
ती गोड हसून नको म्हणते
त्याने कॉफी केल्यावर, ती त्यच्या कपातून पिते
त्यालाही हा प्रकार कळलेला असतो,
म्हणून त्याने आधीच जास्त कॉफी केली असते...
पण
कॉफी त्याच्या कपातून गोड लागते
म्हणून न मागता पिणं
हेच तर प्रेम असतं


ती ऑफिसातून घरी उशीरा येते
तो स्वयंपाक करून ठेवतो
तो जेवण कसं झालय विचारतो
ती छान झालय म्हणते...
त्याच्या खारट भाजीतही त्याचा गोडवा शोधणं
हेच तर प्रेम असतं


तो श्रीमंत नाही
ती पण श्रीमंत नाही
दोघे कट्ट्यावर बसतात, कॉफी मागवतात
भरपूर गप्पा मारतात...
बाहेरच्या थंडीत
गप्पांच्या गर्मित
दोन कप कॉफी
दोन तास टिकवणं
हेच तर प्रेम असतं


तो अग्नि झाला की
ती पाणी होते
ती आरडा-ओरडा करायला लागली
की तो समजून घेतो, समजूत घालतो...
कधी ताणून धरायचं आणि
कधी सोडून द्यायचं हे कळणं
हेच तर प्रेम असतं


मित्रात असताना
तो काहीतरी बोलतो
ती हळूच हसते
मग दोघे हसायला लागतात
मित्रांना काहीच कळत नाही...
हे वेड ज्यांना लागलं त्यांनाच हे कळतं
हेच तर प्रेम असतं

१०
ती त्याला भेटली नसते
तो तिला भेटला नसतो
ती त्याची स्वप्ने बघते
तो ही तिची स्वप्ने बघतो
कल्पनांतच खरी मजा असते
वास्तविकता नेहमिच निराश करते
हेच कदाचित प्रेम असतं

११
तिला रात्री सिनेमा बघायचा असतो
त्याला सकाळी लवकर जाग येत असते
तो रात्री जागून सिनेमा बघतो
सकाळी लवकर जाग येते
तो तिच्यासाठी नाश्ता बनवतो
"तिच्या हास्यापेक्षा झोप महत्त्वाची नसते"...
स्वत:ची थोडीशी गैरसोय करून
दुसऱ्याला खुश करायचं
हेच खरं प्रेम असतं

१२
तिला झोप येत असते
त्याची उद्या परिक्षा असते
ती रात्रभर त्याला सोबत म्हणून
कादंबऱ्या वाचत जागी राहाते...
ही अशी वेडं जे लावतं
तेच तर प्रेम असतं

१३
तो पुढे-पुढे
ती पाठी-पाठी
त्याच्या तोंडात कौळी (कवळी)
आणि तिच्या हातात काठी
हातात हात घेऊन आजी-आजोबा,
उसाचा रस प्यायला जातात
आपल्या म्हाताऱ्या पावलांनी,
तरूण प्रेमींनापण पाठी टाकतात...
प्रेमाच्या झाडाला वर्षांनूवर्ष पाणी घालायचं असतं
हेच तर प्रेम असतं

१४
तिला माणसांचं वेड
त्याला एकटं राहायचा छंद
ती सगळ्यांशी गप्पा मारते
त्याचं तोंड सदैव बंद
पण एकत्र ते दोघे मजेत असतात
तिथे ही दोन टोके बरोबर जुळतात
काय माहिती यांचं इतकं कसं जमतं
हेच कदाचित प्रेम असतं

१५
तो काही रांज्या नाही
आणि ती पण हीर नाही
ती कुठली राणी नाही
आणि तो शूर वीर नाही
पण ती त्याच्या जीवनाची नायिका आहे
आणि तो तिच्या जीवनाचा नायक...
आणि या दोघांची ही साधी सोपी कहाणी
हेच कदाचित प्रेम असतं

१६
तो प्रेमावर कविता करत नाही
तिलाही शायरी वगैरे जमत नाही
तो प्रेम करतो हे सांगावं लागत नाही
तिला प्रेम दर्शवायला शब्द लागत नाही...
दोघांच्या नजरा भेटल्या की
पापण्यातून जे डोकावतं
तेच कदाचित प्रेम असतं

१७
तो शस्त्र खाली ठेवतो
ती पण पराजय स्विकारते
तो तिला त्याचा अभिमान देतो
ती त्याला तिचा अहंकार देते...
जे नाही मिळालं तर मागावसं वाटतं
आणि जे न मागता सगळं मिळवतं...
ज्या लढाईत शरण गेल्यावर
विजय आपोआप मिळतो
तेच खरं प्रेम असतं

१८
तो सारखा तिच्या पुढे-मागे नाही
आणि ती सारखी त्याच्या सोबत नाही
तो त्याच्या वाटेवर तिच्यासाठी थांबतो
ती तिच्या रस्त्यावर त्याची वाट बघते...
जबर्दस्तीने बांधणं प्रेम नाही
जे बंधन स्वतंत्र करतं
तेच खरं प्रेम असतं

१९
तिला थंडी वाजते
त्याच्याकडे स्वेटर असतो
तो स्वेटर तिला देतो
आता तो कुडकुडत असतो
ती जाऊन त्याला मिठी मारते...
अशी उर्जा मिळणार असली
तर कुडकुडण्यात मजा येते
हेच तर प्रेम असतं

२०
माझ्याकडे शब्द आहेत, ओळी आहेत
तिच्याकडे तो आणि त्याच्याकडे ती आहे
त्यांना शब्दांची काय गरज
ज्यांचे डोळे बोलके आहेत
त्यांना प्रेक्षकांची काय आवशक्ता
ज्यांची जीवनं त्यांच्या स्वप्नांसारखी आहेत...
मी ज्या प्रेमाची व्याख्या शोधतो
हे दोघे ते प्रेम जगतात
माझे शब्द जिथे संपतात
यांची जिवने जिथे सुरू होतात
तेच खरं प्रेम असतं

सोडलय

सोडलय


मन सुख-दु:खाच्या पलीकडे
आम्ही रडायचं सोडलय
अदृश्य अश्रु हे सगळे
आम्ही पुसायचं सोडलय


फार खेचल्याने तुटतं
आम्ही ओढायचं सोडलय
खोटी ही नाती सगळी
आम्ही जोडायचं सोडलय


बेभान धावतात सारे
आम्ही चालायचं सोडलय
थांबून आड वाटेवर
तुला शोधायचं सोडलय


घाबरून परिणामाला आम्ही
खोटं लिहायचं सोडलय
कडू सत्य लिहून मग
आम्ही खोडायचं सोडलय


जाळून गेलं सारं आम्हाला
आम्ही आग विजवायचं सोडलय
तिलाच थंड करून आम्ही
विनाकारण जळायचं सोडलय


देवावर अजूनही आहे, माणसावर
विश्वास ठेवायचं सोडलय
मरण सोपं आणि जीवन कठीण
तरी क्षण-क्षण मरायचं सोडलय


लुटलय माणसांनीच सारं
आम्ही भीक मागायचं सोडलय
कपटी आणि स्वार्थी हे जग सारं
आम्ही दुसऱ्यांसाठी जगायचं सोडलय


भयानक स्वप्ने पडतात आम्ही
डोळे मिटून झोपायचं सोडलय
हे होईल ते होईल, असं
बेफिकीर राहायचं सोडलय


स्वत:ला फार शहाणे समजतात
आम्ही शहाणपणा शिकवायचं सोडलय
आहोत ठार वेडे तरी, आम्ही
तेही सगळ्यांना सागायचं सोडलय

१०
असेल तो भयानक आम्ही
थरथर कापायचं सोडलय
असे तरी कुठे फारसे जगतो
आम्ही मरणाला घाबरायचं सोडलय

११
वाहू देत रक्त थोडं, आम्ही
औषध लावायचं सोडलय
बघुया दम किती त्यांच्यात
आम्ही वेदनांना घाबरायचं सोडलय

१२
प्रेमात पडल्यावर कधीतरी
आम्ही चंद्राशी बोलायचं सोडलय
त्याच्या खोट्या प्रकाशात
प्रेमावर कविता लिहायचं सोडलय

१३
घर रिकामं प्रश्न विचारतं
आम्ही उत्तर द्यायचं सोडलय
आणि उत्तर ऐकायचं नाही म्हणून
आम्ही प्रश्न विचारायचं सोडलय

१४
कधी भरून आलंच तर
आम्ही गरजायचं सोडलय
आणि क्वचित गरजलो तरी
आम्ही बरसायचं सोडलय

१५
मिणमिणत्या दिव्यात राहून
स्वत:तले दोष बघायचं सोडलय
जसे आहोत तसे बरे आहोत
आम्ही बदल घडवायचं सोडलय

१६
मित्रांबरोबर असलो तरी
फुकट कॉफी प्यायचं सोडलय
ती रूसलीतर सारंच ठप्प
तिला आम्ही चिडवायचं सोडलय

१७
इथे सगळेच अंधळे
आम्हीपण डोळे उघडायचं सोडलय
बंद आहेत ते बरं आहे
आम्ही वास्तवात फिरायचं सोडलय

१८
वेडेपणा केला की खरचटतं थोडंसं
त्याचा पुरावा मिटवायचं सोडलय
कधी खरचटलेलं आम्हालापण काही
त्याला मनावर घ्यायचं सोडलय

१९
सगळंच दूर जातं म्हणून
कशालाही आपलं म्हणायचं सोडलय
जे आहे ते आपलं आहे
याही भ्रमात जगायचं सोडलय

विचार आणि देव

विचार आणि देव

देवळात गेल्यावर देव म्हणतो
"या आम्ही तुमचिच वाट बघत होतो
चार भिंतीत आणून बसवलं तुम्ही
आम्ही काहीतरी मनोरंजन शोधत होतो

कशात गुंतलेलात इतके की
आम्हाला भेटायला आला नाहीत
का इतके सुख होतं की
आमची आठवणच आली नाहीत"

"देवा माफ कर मला, मी
तुझंच काम करत होतो
डोक्यात भरलेले विचारांचे ढग
त्यांना कागदावर बरसवत होतो

विचार स्वत:चा मर्जीचे मालक
येण्या-जाण्याची काही वेळ नाही
कधी येता जुळून एकत्र मस्त
कधी कशाचाच कशाला मेळ नाही

विचारांचा उगम नाही, अंत नाही
तयार करणारं त्यांना यंत्र नाही
कॉफीचा नैवेद्य दाखवलातरी
त्यांना आवडणारा कोणता मंत्र नाही

तूच दाता, तूच विधाता देवा
तुझ्याकडे नेहमीच यावसं वाटतं
पण जे सहजपणे मिळत नाही
तेच जास्त हवसं वाटतं"

--मयुरेश कुलकर्णी

अर्थ नसलेल्या कविता - "मी ठीक आहे, मी मजेत आहे"

अर्थ नसलेल्या कविता - "मी ठीक आहे, मी मजेत आहे"


आता कशाला खोटं बोलायचं
या कवितांना खरच काही अर्थ नाही
प्रेम नाही, लोभ नाही, दु:ख नाही
आणि आकार वगैरे तर नाहीच नाही


काय शोधताय तुम्ही? कवितेत?
काय पाहिजे तुम्हाला?
या कवितांकडून काही मागू नका
कारण मी काही देणार नाही
वाचायचं असेल तर वाचा
नाहीतर सोडून द्या


परत एकदा सांगतो मी
या कवितांना खरच काही अर्थ नाही
आणि काही बिघडलं नाही माझं
मी ठीक आहे, मी मजेत आहे

--मयुरेश
----------------------------------------------


चुर्गळलेल्या कागदाचे बोळे
माझ्या टेबलावर वाढतात
आणि रिकामे कागद
माझ्याकडे टक लाऊन पाहतात


पेन लिहायचं सोडून
माझी चेष्टा करू लागतं
आणि मी नाही म्हटलं तरी
मन अवघड प्रश्न विचारू लागतं

म्हणतं
जेव्हा लोकं तुला विचारतात
की तू कसा आहेस?
तेव्हा तू म्हणतोस
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"
पण तू खरंच ठीक आहेस का?
मजेत आहेस का?

--मयुरेश
-----------------------------------------------------------


जगण्याचा अर्थ शोधत शोधत
कसलं हे तुझं निरर्थक जगणं
जणू प्रकाशासाठी सूर्याकडे जाणं
आणि प्रखर प्रकाशात अंधळं होणं


काही प्रश्नांची उत्तरं
आपल्याला माहिती असतात,
पण मानाला सांगायची नसतात
म्हणून सूर्याकडे बघून
डोळे बंद करून
आपण आपला अंधार करायचा असतो

--मयुरेश
------------------------------------------------------


आणि मी पण हसत
गरम-गरम कॉफीचा कप
ओठाला लाऊन म्हणालो
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

--मयुरेश
-----------------------------------------------------


दाणा टाकल्यावर अंगणी
चिमुकली पाखरे येती
दाणा टिपत पोट भरत
मला आनंद देऊनी जाती

१०
गरम गरम कॉफी केल्यावर
मनाच्या अंगणात विचारांची पाखरं येती
कॉफी पिऊन, कविता सुचवून
मला आनंद देऊनी जाती
--मयुरेश

---------------------------------------------------

११
मला सांगायचं होतं
तुला माहिती होतं की, मला सांगायचं होतं
पण तू विचारलं नाही
आणि तू विचारलं नाही म्हणून
मी सांगितलं नाही
आता वेळ गेली
आता मी म्हणतो मी ठीक आहे
पण तू विचारायला पाहिजे होतं
आणि तू विचारलं नाही
हे पण माझ्या लक्षात आहे

-- मयुरेश

१२
कधी कधी काहीच ठीक नसतं
आपलं जीवन आपल्याच हातात
तुटलेल्या आरशासारखं
आपलंच मोडकं चित्र घेऊन
तुटून, विखरून आपल्याकडे पाहातं
आणि तरीही आपण म्हणायचं असतं
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- मयुरेश

१३
आणि आपण म्हणतो,
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"
म्हणूनच कधी ठीक नसताना
मनाला वाटतं सगळं ठीक आहे
डोळ्यातलं पाणी गळू न देता
सय्यम सुटू न देता
दु:ख बाहेर जायच्या आधी
पटकन मनाचं दार बंद करायचं
आणि खोटं खोटं का होईना
म्हणायचं "मी ठीक आहे"
-- मयुरेश
--------------------------------------------
१४
आज काहीच झालं नाही
मी काहीच केलं नाही
आणि मी काहीच केलं नाही
म्हणून काहीच झालं नाही

-- मयुरेश

१५
कवितांचं थोडंसं प्रेमासारखं असतं
आपण त्याच्या पाठी पळतो तेव्हा
ते आपल्यापासून दूर धावतं
आणि कधी काही सूचना न देता
असंच अचानक होऊन जातं
म्हणूनच कविता आणि प्रेमात
जबरदस्ती करून चालत नाही
त्यांना व्हायचं असेल तेव्हा होतात
मुद्दाम काही करावं लागत नाही

--मयुरेश
-------------------------------------------

शांत जगतो तरी
जगण्याचा शोध घ्यायचा आभास करतो निर्माण
निरर्थक क्रिया शोधयात्रा म्हणून
करतो मनाचे खोटे समाधान
नसलेल्या प्रश्नांवर करतो बौधीक काथ्याकूट
आणि असलेल्या प्रश्नांकडे करतो डोळेझाक
नको ते करायचे
पाहिजे त्या पासून पळायचे
आणि तरी म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी

अर्थाचे अनर्थ
तया म्हणायचे मतितार्थ
नको ते सारे काथ्याकूट
करत राहायचे
नसलेले अर्थ काढत राहायचे
दिसणाऱ्याकडे दुर्लक्ष करायचे
नसलेले शोधून काढायचे
त्याला म्हणायचे संशोधन
आणि मग हसत म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी

रोज लिहा म्हणून मागे लागायचे
अर्थहीन शब्दांचे काव्य जमवायचे
लिहीत नाही म्हणून नाराज व्हायचे
आणि लिहीले की खुळे म्हणायचे
मग विचारायचे
कसे आहात
आणि मी म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी
-----------------------------------------------------

कधी तलावात पोहायच्या आधी
नीट पोहायला शिकावे
पाणी गार आहे का हे तपासावे
किती खोल आहे ते मोजावे
पाण्यात काही खतरा नाही ना, हे शोधावे
आणि कधी मात्र
पळत-पळत यायचे
आणि धापकन पाण्यात पडायचे
आणि हात-पाय मारून तरंगायचे

-- मयुरेश

-------------------------------------------------

लोकांची दु:ख पाहिल्यावर
वेदना अनुभवल्यावर
लोकांच्या रोजच्या लढाया
जगण्यासाठी केलेला संघर्ष
यांच्या समोर आपलं जीवन
मस्त वाटतं, मजेत वाटतं
जे आहे ते भरपूर आहे
आणि जे आहे ते आपलं आहे
रस्त्यावर राहणाऱ्यांकडे बघून
आपलं गळतं छप्पर बरं वाटतं
त्यावेळी देवाचे आभार मानत म्हणायचं
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

--मयुरेश

गरम गरम कॉफी केल्यावर
मनाच्या अंगणात विचारांची पाखरं येती
कॉफी पिऊन, कविता सुचवून
मला आनंद देऊनी जाती

--मयुरेश
--THE END

मी काहीच केलं नाही

मी काहीच केलं नाही


भायखळा ते ठाणे जलद लोकल
एका सिग्नलवर क्षणभर थांबली
मी ट्रेनच्या दारात उभा
मी सहज बाहेर नजर टाकली
माझी नजर दोन लहान डोळ्यांनी पर्तवली
आणि मी काहीच केलं नाही


दोन लहान डोळे, कोमल डोळे
शुभ्र, पवित्र, निरागस डोळे
एका लहान मुलाचे गरीब डोळे
मला मदत मागत होते
आणि मी काहीच केलं नाही


तो बाजूच्या रिकाम्या रूळावर बसला होता
दगडांशी खेळत होता
आणि आई भाजा उगवत होती
तो दया मागत नव्हता पण
मी त्याला फक्त दया दिली
आणि मी काहीच केलं नाही


माझ्याबरोबर इतरही लोकं होते
त्यांचीही मनं त्यांना सांगत होती
मुलांची जागा रूळावर नाही
त्यांनी पण दुर्लक्ष केलं, आणि मी पण
इतरांपेक्षा मी वेगळा असं म्हणतो, पण
इतरांपेक्षा वेगळं असं
मी काहीच केलं नाही


तो मजेत खेळत होता, रमत होता
माझ्याकडे दयेची भीक मागत नव्हता
मलाच वाईट वाटलं, आणि मी क्षणात
त्याला दया देऊन, त्याचा अपमान केला
आणि मी काहीच केलं नाही


त्याच्यासारखी कित्येक मुलं असतात
हे ठाऊक आहे मला
मी एकटाच काही करू शकत नाही
हे पण माहिती आहे
पण कोणी काहीच केलं नाही
तर कधीच काही होणार नाही
आणि करायची संधी मिळाली
तेव्हा मी काहीच केलं नाही


मला त्याच्याएवढी भाची आहे
तो ही कोणाचा भाचा असेल
मी काहीतरी करू शकलो असतो
पण मी काहीच केलं नाही


माझी जशी स्वप्ने आहेत
तशी उद्या त्याचीही असतील
आपण आपलं भाग्य घेऊन येतो
मी भाग्यवान, आणि तो नाही
करणारे, समाजाचे नियम तोडून करतात
पण मी काहीच केलं नाही


मला काय झालं? काय बदललं?
मी तर असा नव्हतो
रोज रोज हेच बघतो म्हणून
न बघीतल्या सारखं करतो का?
मी इतका क्रूर, इतका कठोर
इतका दगड कधी झालो की
मी काहीच केलं नाही

१०
ट्रेन पुन्हा सुरू झाली
थांबलेल्या जगाबरोबर मी वेग घेऊ लागलो
बाकीच्या लोकांसारखं मी ही
काही झालं नाही असं वागलो
माझीच मला लाज वाटली की
मी काहीच कसे केलं नाही

११
तेच लहान, निरागस डोळे
रात्री झोपताना मला परत आठवले
आणि माझं मन मला सतावू लागले
आता कधीच ते डोळे विसरणार नाही
आणि जेव्हा आठवतील
तेव्हा आठवण करून देतील
की मी काहीच केलं नाही

--मयुरेश

माया

माया

मी थकून घरी येतो
दिवे घालवतो, झोपायला जातो
पांघरूण डोक्यावरून घेतलं की
कानात एक आवाज
हळूच येऊन सांगतो

आज थकला असशील तू
शरीर कष्ट करून थकतं
पण काम झालं नाही
तुझं काम संपलं नाही
ही क्षणभराची विश्रांती आहे
हा अंत नाही, ही निवृत्ती नाही
काम संपल्या शिवाय तुला
चांगली झोप लागणार नाही

कदाचित हीच अस्वस्थता
मला सकाळी उठवते
मनात समाधान नाही
म्हणून शरीर राबतं

माझं काम अजून झालं नाही
संपलं तर नाहीच, कदाचित
सुरूपण झालं नाही
आज पर्यंत जे केलं ते
शिक्षण होतं, पाया होता
अजून कर्माची इमारत
त्याच्यावर उभारली नाही

मग परत रात्रीचे आवाज
मला सांगतात
पण काम अजून झालं नाही
तुझं काम संपलं नाही

-- मयुरेश कुलकर्णी
---------------------------------------------

मला वाटतं, मी वेडा
हे आवाज कोणालाच कळत नाही
पण कधी वाऱ्याला हात लावला
की कळतं हे आवाज खोटे नाही

याला उत्तरही नाही आणि
स्पष्टीकरण ही नाही
पण तसंही प्रेम करायला
विश्वास ठेवायला
कारण कुठे लागतच नाही

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------

कधी हा आवाज म्हणतो
कॉफी म्हणजे कॉफी नाही
नुसतं उकळलेलं पाणी नाही
विर्घळणारे काळे कण नाही

कॉफीच्या वाफेत एक तरंग
काळ्या पाण्यात प्रकाश
कणाकणात लपलेले माझे विचार
डोक्यात उर्जा पोचवणार

कधी बंद दरवाजे उघडणार
कधी रस्ते दिशा दाखवणार
कधी आई बाळाला जवळ घेते
तसं जवळ घेऊन म्हणणार

काळजी करू नकोस
तू एकटाच नाहीस
तू जाशील तिथे मी
तुझ्या बरोबर आहे

....कॉफी म्हणजे कॉफी नाही

-- मयुरेश कुलकर्णी

------------------------------------------------

कधी येतात वादळं
कधी सुटतात वारे
माझं समुद्र किनाऱ्यावर घर
मी बसून बघतो सारे

घराच्या भिंती बाहेर
लागतात पाठी माझ्या
मी विचारांच्या वादळापुढे
मला पकडायचा प्रयत्न करतात

मी पळून घरात जातो
वादळ कागदावर लिहून काढतो
कधी वादळात विचार भरकटतात
जेव्हा घरात जायला वेळ लागतो

कधी वेळेवर आलो मी तर
तेव्हा सरळसोट येतात बरोबर
कधी थोडासा उशीर झाला
की शेपटी धरून उतरवतो कागदावर

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------

काम करताना स्वत:ला विचारतो
की हे सगळं का करतो मी
('का?' हा प्रश्न विचारायची
वाईट सवय ही जात नाही)
मी हे का करतो
काय कारण, काय प्रेरणा

हे करून काय मिळतं
आणि काय हरवतं
खरंच काही मिळतं का
फक्त भास होतो
हे सगळं खरं कसं करायचं
आणि ते खरं करायचं
का आपणच खोटं व्हायचं
स्वत:च एक भ्रम बनायचं
काय सोपं? काय अवघड?
याचं वजन करून हा
निर्णय का घ्यायचा

आणि जर हे खरं करायचं
तर ते करायचं कोणासाठी
माझ्यासाठी?
नाही हे डोळे बंद केले तर
हे सगळ खरं आहे माझ्यासाठी
आणि जर माझ्यासाठी नाही
तर ते करायचं कोणासाठी

आणि जर लोकांसाठी करतो
तर मी हे का करतो

का? हा प्रश्न विचारायची
वाईट सवय जात नाही
उत्तर तर मिळत नाही
आणि समाधान तर नाहीच नाही

-- मयुरेश कुलकर्णी
-----------------------------------------------------

डोळे उघडले की दार दिसतं
दार उघडलं की अंधारी खोली
मग परत त्या खोलीत दारं
आणि बरीच दारं आणि
बाऱ्याच खोल्या

अंधारातून हात येतात
किंवा त्याचा भास होतो
ते मला खेचतात
दारांकडे नेतात

पण मला हे हात नकोत
त्यांचा स्पर्शही नको
खोल्या नकोत आणि
दारं तर नकोच नको

हा खेळ मला खेळायचा नाही
दारं उघडायची नाही
खोल्या ओलांडायच्या नाही

म्हणून मी डोळे उघडत नाही
आणि दार उघडायचा,
बघायचाही,
प्रश्न पडत नाही

-- मयुरेश कुलकर्णी
---------------------------------------------

सुख आणि समाधानात
गोंधळ होण्याची कारणे
माझ्या मनात अनेक

मी नक्की केव्हा काय?
हे कधीच कळत नाही मला

तो आवाज सांगतो मला
मी समाधानी नाही
प्रत्येक कोडं सुटलं की
काही क्षण आनंद
पण परत कोडी लागतात
अजून प्रश्न पाहिजे असतात
हे समाधान नाही

आणि सुखाची व्याख्या तर
इतकी बदलते की ती
कधीच हातात सापडत नाही

उपाशी माणसाला भाकरीच्या
कणात मिळतं ते सुख?
प्रेमिला प्रेमिकेच्या
प्रेमात मिळतं ते सुख?
बाळाला आईच्या कुशीत
सुरक्षतेचं सुख?
पैसे मिळाल्याचं सुख का,
गेल्यावर नसल्याचं सुख?
किंवा
सुखाचा भास म्हणजे सुख
का दु:खाचा आभाव म्हणजे सुख?

कदाचित
रात्री झोप लागणं आणि
सकाळी उठल्यावर काम करावसं वाटणं
हेच कदाचित सुख

-- मयुरेश कुलकर्णी
-------------------------------------------------------------------

एकदा मावशी म्हणाली मला
"तुला वेदना विकता आल्या पाहिजे"

खरंतर विकणं म्हणजे
वेदना देऊन, पैसे घेणं हे नाही
विकणं म्हणजे
आपल्या वेदना लोकांना
दाखवून, समजवून
भोगता आल्या पाहिजेत
हे विकणं
मग त्यात पैसे असो वा नसो

आणि कधी कधी खरंच वाटतं
वेदना विकता आल्या पाहिजे

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------------------------

शक्ति, भक्ति आणि मुक्ति
यांची गोष्ट एकदम
साधी, सरळ आहे

त्याने जन्म दिला मला
त्याने जगायची शक्ति दिली
त्याने सुरू केलं सारं
त्याने अंताला मुक्ति दिली

आता सुरू तर त्याने केलं
आणि संपवायचं पण त्याने
माझ्या हातात फक्त
भक्ति दिली

रोज उठायचं
अन्न खायचं
पाणी प्यायचं
आपलं काम करायचं
एवढच नीट करून झोपायचं

इतकच माझ्या हातात आहे
हीच माझी भक्ति आहे

-- मयुरेश कुलकर्णी
----------------------------------------

मी मायाला सांगतो
आता मी काम करतोय
आता मला वेळ नाही

काल कॉफी पीत होतो
तुझी वाट बघत होतो
आपली ठरलेली भेट
तुझ्यासाठी थांबलो होतो

तू डोक्यातही आली नाही
कागदावरही आली नाही
वाया गेली कॉफी माझी
प्रेरणा काही आली नाही

आता तू आलीस अचानक
कागदावर जन्मायचं तुला
पण आता मी काम करतोय
आता वेळ नाही मला

तुला भ्रमातून सत्यात यायचं
असेल तर थांब
तुला जन्मायचं असेल तर थांब

कारण आता मला वेळ नाही
काल मी थांबलो होतो पण
तू आलीच नाहीस
यात माझा दोष नाही

-- मयुरेश कुलकर्णी
-----------------------------------------------------

कधी माणसाशी बोलताना त्याच्या
डोळ्यांकडे लक्ष द्या
आणि तो "मी तयार आहे" किंवा
फक्त "मी आहे" असं
म्हणाला तर परत बघा

जर त्याच्या डोळ्यात गांभिर्य दिसलं
तर एक वेगळच तेज दिसेल
अशावेळी माणूस, माणूस नाही
शक्तिशाली देव असेल

हे दर-रोज होत नाही
आणि सहज होत नाही
पण जेव्हा होतं तेव्हा असं की
कसलच स्पष्टीकरण लागत नाही

ही वेळ फार शुभ
कारण माणूस सगळं स्विकारतो
धाडस एकवटून सारं
नशिब परत लिहायचं ठरवतो

नशिब तोडतं त्याला
तो परत स्वत:ला जोडतो
आणि जोडलेल्या ठिकाणी
तो अजून मजबूत बनतो

डोळ्यात तेज असतं
तो नशिबाकडे बघतो
फारसं बोलत नाही
फक्त "मी तयार आहे" म्हणतो

-- मयुरेश कुलकर्णी

----------------------------------------------------------------------

प्रत्येका माणसाला खोलीत
एक समाधीस्थान असावं

जसं झोपल्यावर शरीराला विश्रांती मिळते
तसं या स्थानावर बसून शांती मिळावी

मला असं वाटतं
की प्रत्येका मनाला
शांतता हवी असते
आवाज नसलेली शांतता नाही
आणि सगळे आवाज असलेलीही नाही
आणि विचारांची पण नाही

पण प्रत्येका माणसाला
एक समाधीस्थान असावं

तिकडे गेल्यावर त्याचं मन मोकळं व्हावं
परत जगायची इच्छा जागी व्हावी

एकांतात जसं दु:ख आहे
तशी शक्ति पण आहे
प्रेरणा आहे, स्वतंत्रता आहे
स्वत:च्या शोधाचा आग्रह आहे

प्रत्येका मनाला कुठेतरी स्वतंत्र वाटावं
घरात असल्यासारखं मुक्त वाटावं
म्हणून प्रत्येकाने स्वत:च्या मनासाठी
किमान एवढं तरी करावं

-- मयुरेश कुलकर्णी

----------------------------------------------------------------------

माझ्याकडे उत्तरं नाहीत

माझ्याकडे उत्तरं नाहीत


काही विचार कसे हाताळावे
ते मला कधीच कळत नाही
ते विचार मला थांबवतात
आणि मी कधीच पळत नाही

मग हातात येतात ते
विचार कागदावर मांडतो
आणि त्या रिकाम्या कपात
मी कॉफी बनून सांडतो

कधी पेटवणारी ठीणगी
कधी पेटलेली आग आहे
कधी थंड झालेली कॉफी
कधी तिचा पडलेला डाग आहे

कितीही शिकलो तरी
मला न कळलेली उत्तरं आहेत
सदैव पडणारे प्रश्न आणि
त्यांची न मिळालेली उत्तरं आहेत

-- मयुरेश कुलकर्णी

--------------------------------------------------------


आजकाल अडकलेल्या श्वासात
स्वातंत्र्य का सापडत नाही
मुक्तपणे श्वास कोंडतो पण
ते ही मनाला आवडत नाही

आजकाल प्रश्न जास्त
आणि एकही उत्तर मिळत नाही
का जगावं? कसं जगावं?
मनाला कशासाठी जगवावं कळत नाही?

आजकाल मन गोंधळतं इतकं
की निराशही ते होत नाही?
आणि सुखी कधी नव्हतंच
पण समाधानी पण होत नाही?

आजकाल कापलेले हात चालतात
कापणारे हात चालत नाही
न होण्याऱ्या संकटाची चिंता मारते
माणसाला संकट मारत नाही

आजकाल मी म्हणतो मी वेडा
कुणाला शहाणपण शिकवू शकत नाही
वेडा असलो तरी इतकं कळतं की
बुध्दीत सुख टिकत नाही

-- मयुरेश कुलकर्णी

-----------------------------------------------------------------


घड्याळ म्हणतं रात्र झाली
शरीर म्हणतं झोपू दे
मन उत्तरं शोधत बसतं
आणि मी म्हणतो बसू दे

माझ्याकडे उत्तरं नाहीत
प्रश्न ही वाटतं बरोबर नाहीत
वाटतं हा शोधच एकटा
देव ही वाटतं बरोबर नाही

पण प्रश्न विचारल्याशिवाय
मन शांत बसत नाही
आणि या उत्तराच्या
शोधाचा अंत दिसत नाही

शोधणारे संपले तर मग
उत्तरंच प्रश्नात लपून जाईल
आणि घड्याळाचा आदेश पाळत
मी प्रश्न घेऊन झोपून जाईन

-- मयुरेश कुलकर्णी

---------------------------------------------------------------


माझ्याकडे उत्तरं नाहीत

काळ्या अंधारात दडलेला
समाजाचा चेहरा पहावा कसा
आणि सज्जनांचे मुखवटे सगळे
राक्षसाचा चेहरा ओळखावा कसा

पोट हातावर घेऊन जगणाऱ्यांच्या
नशिबाचा भार अनुभवावा कसा
अपंगांची लाचारी जाणून आपण
त्यांच्यातला स्वाभिमान जगावा कसा

जन्मलेल्या बाळाला त्याच्या
आईचा त्याग सांगावा कसा
आणि मुक्या रिकाम्या पोटाचा
वेदनांचा आवाज ऐकावा कसा

ज्यांचं दु:ख मला कळत नाही
त्यांना नावं ठेवायचा, हक्क मला नाही
मी काही केलं नाही, तर
"काही होत नाही" म्हणायचा हक्क मला नाही

जे मी समजू शकत नाही
त्याचा मी आदर केला पाहिजे
आदराला कारणं लागलीच
तर मी निरपेक्ष प्रेम केलं पाहिजे

उत्तरं मिळाली नाहीततरी
सतत प्रश्न विचारत जगावं
जशी जमेल तशी मदत करत
देवाचे आभार मानत जगावं

-- मयुरेश कुलकर्णी

कॉफी, कविता, ती आणि मी

कॉफी, कविता, ती आणि मी

माझी कॉफी आली
तिची कॉफी आली
ती म्हणाली "छे ही काही
कवितेची सुरूवात झाली"

मी थोडीशी प्यायली
तिने थोडीशी प्यायली
ती म्हणाली "अरे ही काही
सांगायची गोष्ट झाली?"

जवळ बसली
हळूच हसली
मी म्हटलं वेळ नाही मला
माझी कविता सुरू झाली

मग ती कामात रमली
माझी कविताही जमली
मला जास्त कोण आवडतं
यावर चर्चा सुरू झाली

तीला वाटलं कविता आवडते
मी म्हटलं मला तू आवडते
या वादाची भिंत होऊन
आमच्यामध्ये उभी झाली

"करावं लागेल काहीतरी
अरे कवि, कर काहीतरी"
माझ्या मनात या विचारांची
चक्रे परत सुरू झाली

मी तिला जवळ घेतली
ती पण जवळ आली
खोट्या रागाची भिंत आता
तिच्या हास्यात गायब झाली

तुला कविता नाही आवडत
मीच मी म्हणून आवडतो
म्हणून मला तू आवडतेस
...आणि परत कॉफी प्यायला सुरूवात झाली

-- मयुरेश

आमचा देव

आमचा देव

जगात वावरतो एकटे आम्ही
आमचा देव बरोबर चालतो

जिवनाच्या कोर्टात आरोपी आम्ही
आमचा देव साक्ष आणि न्याय देतो

अंधारात भटकतो बिंधास्त आम्ही
आमचा देव हातातला कंदिल बनतो

हातात लेखणी घेतो आम्ही
आमचा देव कविता करतो

आमचं काम करतो आम्ही
आमचा देव बाकीचं संभाळतो

पुरात बुडता बुडता वाचतो आम्ही
आमचा देव आम्हाला खांद्यावर घेतो

दु:खासाठी कठोर ढाल आम्ही
आमचा देव सुखाची तलवार धरतो

त्याच्या मुलासारखं चुकतो आम्ही
आमचा देव चटके देऊन सुधारतो

उघड्या रानात स्वच्छंद झोपतो आम्ही
आमचा देव आमच्यावर कृपा पांघरतो

-- मयुरेश कुलकर्णी