Saturday, June 5, 2010

कॉफी, कविता, ती आणि मी

कॉफी, कविता, ती आणि मी

माझी कॉफी आली
तिची कॉफी आली
ती म्हणाली "छे ही काही
कवितेची सुरूवात झाली"

मी थोडीशी प्यायली
तिने थोडीशी प्यायली
ती म्हणाली "अरे ही काही
सांगायची गोष्ट झाली?"

जवळ बसली
हळूच हसली
मी म्हटलं वेळ नाही मला
माझी कविता सुरू झाली

मग ती कामात रमली
माझी कविताही जमली
मला जास्त कोण आवडतं
यावर चर्चा सुरू झाली

तीला वाटलं कविता आवडते
मी म्हटलं मला तू आवडते
या वादाची भिंत होऊन
आमच्यामध्ये उभी झाली

"करावं लागेल काहीतरी
अरे कवि, कर काहीतरी"
माझ्या मनात या विचारांची
चक्रे परत सुरू झाली

मी तिला जवळ घेतली
ती पण जवळ आली
खोट्या रागाची भिंत आता
तिच्या हास्यात गायब झाली

तुला कविता नाही आवडत
मीच मी म्हणून आवडतो
म्हणून मला तू आवडतेस
...आणि परत कॉफी प्यायला सुरूवात झाली

-- मयुरेश

No comments:

Post a Comment