Saturday, June 5, 2010

अर्थ नसलेल्या कविता - "मी ठीक आहे, मी मजेत आहे"

अर्थ नसलेल्या कविता - "मी ठीक आहे, मी मजेत आहे"


आता कशाला खोटं बोलायचं
या कवितांना खरच काही अर्थ नाही
प्रेम नाही, लोभ नाही, दु:ख नाही
आणि आकार वगैरे तर नाहीच नाही


काय शोधताय तुम्ही? कवितेत?
काय पाहिजे तुम्हाला?
या कवितांकडून काही मागू नका
कारण मी काही देणार नाही
वाचायचं असेल तर वाचा
नाहीतर सोडून द्या


परत एकदा सांगतो मी
या कवितांना खरच काही अर्थ नाही
आणि काही बिघडलं नाही माझं
मी ठीक आहे, मी मजेत आहे

--मयुरेश
----------------------------------------------


चुर्गळलेल्या कागदाचे बोळे
माझ्या टेबलावर वाढतात
आणि रिकामे कागद
माझ्याकडे टक लाऊन पाहतात


पेन लिहायचं सोडून
माझी चेष्टा करू लागतं
आणि मी नाही म्हटलं तरी
मन अवघड प्रश्न विचारू लागतं

म्हणतं
जेव्हा लोकं तुला विचारतात
की तू कसा आहेस?
तेव्हा तू म्हणतोस
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"
पण तू खरंच ठीक आहेस का?
मजेत आहेस का?

--मयुरेश
-----------------------------------------------------------


जगण्याचा अर्थ शोधत शोधत
कसलं हे तुझं निरर्थक जगणं
जणू प्रकाशासाठी सूर्याकडे जाणं
आणि प्रखर प्रकाशात अंधळं होणं


काही प्रश्नांची उत्तरं
आपल्याला माहिती असतात,
पण मानाला सांगायची नसतात
म्हणून सूर्याकडे बघून
डोळे बंद करून
आपण आपला अंधार करायचा असतो

--मयुरेश
------------------------------------------------------


आणि मी पण हसत
गरम-गरम कॉफीचा कप
ओठाला लाऊन म्हणालो
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

--मयुरेश
-----------------------------------------------------


दाणा टाकल्यावर अंगणी
चिमुकली पाखरे येती
दाणा टिपत पोट भरत
मला आनंद देऊनी जाती

१०
गरम गरम कॉफी केल्यावर
मनाच्या अंगणात विचारांची पाखरं येती
कॉफी पिऊन, कविता सुचवून
मला आनंद देऊनी जाती
--मयुरेश

---------------------------------------------------

११
मला सांगायचं होतं
तुला माहिती होतं की, मला सांगायचं होतं
पण तू विचारलं नाही
आणि तू विचारलं नाही म्हणून
मी सांगितलं नाही
आता वेळ गेली
आता मी म्हणतो मी ठीक आहे
पण तू विचारायला पाहिजे होतं
आणि तू विचारलं नाही
हे पण माझ्या लक्षात आहे

-- मयुरेश

१२
कधी कधी काहीच ठीक नसतं
आपलं जीवन आपल्याच हातात
तुटलेल्या आरशासारखं
आपलंच मोडकं चित्र घेऊन
तुटून, विखरून आपल्याकडे पाहातं
आणि तरीही आपण म्हणायचं असतं
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- मयुरेश

१३
आणि आपण म्हणतो,
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"
म्हणूनच कधी ठीक नसताना
मनाला वाटतं सगळं ठीक आहे
डोळ्यातलं पाणी गळू न देता
सय्यम सुटू न देता
दु:ख बाहेर जायच्या आधी
पटकन मनाचं दार बंद करायचं
आणि खोटं खोटं का होईना
म्हणायचं "मी ठीक आहे"
-- मयुरेश
--------------------------------------------
१४
आज काहीच झालं नाही
मी काहीच केलं नाही
आणि मी काहीच केलं नाही
म्हणून काहीच झालं नाही

-- मयुरेश

१५
कवितांचं थोडंसं प्रेमासारखं असतं
आपण त्याच्या पाठी पळतो तेव्हा
ते आपल्यापासून दूर धावतं
आणि कधी काही सूचना न देता
असंच अचानक होऊन जातं
म्हणूनच कविता आणि प्रेमात
जबरदस्ती करून चालत नाही
त्यांना व्हायचं असेल तेव्हा होतात
मुद्दाम काही करावं लागत नाही

--मयुरेश
-------------------------------------------

शांत जगतो तरी
जगण्याचा शोध घ्यायचा आभास करतो निर्माण
निरर्थक क्रिया शोधयात्रा म्हणून
करतो मनाचे खोटे समाधान
नसलेल्या प्रश्नांवर करतो बौधीक काथ्याकूट
आणि असलेल्या प्रश्नांकडे करतो डोळेझाक
नको ते करायचे
पाहिजे त्या पासून पळायचे
आणि तरी म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी

अर्थाचे अनर्थ
तया म्हणायचे मतितार्थ
नको ते सारे काथ्याकूट
करत राहायचे
नसलेले अर्थ काढत राहायचे
दिसणाऱ्याकडे दुर्लक्ष करायचे
नसलेले शोधून काढायचे
त्याला म्हणायचे संशोधन
आणि मग हसत म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी

रोज लिहा म्हणून मागे लागायचे
अर्थहीन शब्दांचे काव्य जमवायचे
लिहीत नाही म्हणून नाराज व्हायचे
आणि लिहीले की खुळे म्हणायचे
मग विचारायचे
कसे आहात
आणि मी म्हणायचे
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

-- शिल्पा मावशी
-----------------------------------------------------

कधी तलावात पोहायच्या आधी
नीट पोहायला शिकावे
पाणी गार आहे का हे तपासावे
किती खोल आहे ते मोजावे
पाण्यात काही खतरा नाही ना, हे शोधावे
आणि कधी मात्र
पळत-पळत यायचे
आणि धापकन पाण्यात पडायचे
आणि हात-पाय मारून तरंगायचे

-- मयुरेश

-------------------------------------------------

लोकांची दु:ख पाहिल्यावर
वेदना अनुभवल्यावर
लोकांच्या रोजच्या लढाया
जगण्यासाठी केलेला संघर्ष
यांच्या समोर आपलं जीवन
मस्त वाटतं, मजेत वाटतं
जे आहे ते भरपूर आहे
आणि जे आहे ते आपलं आहे
रस्त्यावर राहणाऱ्यांकडे बघून
आपलं गळतं छप्पर बरं वाटतं
त्यावेळी देवाचे आभार मानत म्हणायचं
"मी ठीक आहे, मी मजेत आहे"

--मयुरेश

गरम गरम कॉफी केल्यावर
मनाच्या अंगणात विचारांची पाखरं येती
कॉफी पिऊन, कविता सुचवून
मला आनंद देऊनी जाती

--मयुरेश
--THE END

1 comment: